कणकवली : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई यासंस्थेच्या काळाचौकी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच झालेल्या निवडणुक कार्यक्रमाच्या विशेष सभेत निवडणूक निरीक्षक सुहास गांवकर यांच्या मार्गदर्शनात नूतन केंद्रीय कार्यकारिणीची तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली.क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई या संस्थेच्या राज्य अध्यक्षपदी घन:श्याम गांवकर यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी लक्ष्मण घाडीगांवकर आणि सरचिटणीसपदी गजानन घाडीगांवकर यांची देखील फेर निवड झाली. समस्त घाडीगांवकर समाजाची शिखर संस्था असलेली क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, ही समाजिक संस्था १ मार्च १९२५ साली स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली आहे. वागदे सिंधुदुर्ग येथील समाजाच्या जागेत प्रशस्त घाडीगांवकर समाज भवन निर्माण करण्याचे ध्येय असलेल्या या समाज संस्थेच्या चिटणीस पदी रश्मी घाडीगांवकर तर खजिनदारपदी सुहास गांवकर यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी सदस्यांमध्ये पत्रकार विजय गांवकर ,चंद्रकांत पारधी , आत्माराम गांवकर, विकास घाडीगांवकर , शरद घाडी , नारायण गांवकर , नंदकुमार घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष घन:श्याम गांवकर यांनी येत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा केली. गणेशोत्सवा नंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येईल. शतक महोत्सवी वर्षाची सांगता मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य कार्यक्रम घेऊन जनजागृती व निधी संकलन करण्यात येईल. तसेच घाडीगांवकर समाज भवन , वागदे प्रकल्पासंबंधी सर्व विभागीय समितीची संयुक्त सभा घेऊन विचारांती विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येईल , असे त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग , मुंबई , मुंबई उपनगर , पुणे , नागपूर सहित संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील घाडीगांवकर समाजातील सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.