आचारसंहितेपुर्वी आंबोली – गेळे – चौकुळचा प्रश्न सोडविणार ; मुख्यमंत्र्यांचा शब्द
सावंतवाडी : वादळी वार्यामुळे कोसळलेल्या पुतळ्याचे कोणी राजकारण करू नये. लवकरच त्या ठिकाणी १०० फुटाहून अधिक उंचीचा पुतळा उभारु, त्या ठिकाणी उभारलेला पुतळा हा लहान असल्यामुळे अनेकांना रुचले नव्हते. त्यामुळे ही घडलेली घटना म्हणजे नवीन पुतळ्याचे संकेत आहेत, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान चौकुळ, आंबोलीसह गेळे गावातील लोकांना येत्या १५ दिवसात न्याय मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापुर्वी त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रश्नी चुकीची माहिती देवून भडकविण्याचा प्रयत्न करणार्यांवर कोणी विश्वास ठेवू नये, असे ही ते म्हणाले.
श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. मात्र याचे कोणी राजकारण करू नये तर येणार्या काळात तटापेक्षा उंच पुतळा उभारण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी मी स्वतः उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेईन. आमदार वैभव नाईक यांच्याकडुन झालेला मोडतोडीचा प्रकार हा भावनेच्या भरातून झाला. ते तरुण आहेत. त्यामुळे त्यांनी तो केला असावा. मात्र सर्व विषयावर शांतता कशी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. ते पुढे म्हणाले, आंबोली, चौकुळ आणि गेळे गावांना भेडसावणारा प्रश्न सोडविण्यासाठी मी अनेक दिवस प्रयत्नशील आहे. तेथील स्थानिक लोकांना सुध्दा हे माहित आहे. मात्र काही लोक चुकीची माहिती देवून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू आंबोली आणि चौकुळ ही माझी दुसरी घरे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही तर आचारसंहिता संपण्यापुर्वी त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.