सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
कणकवली : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणानंतर कणकवली येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गेटवरच रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम अभियंता विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, मंगेश लोके, विलास गुडेकर, महेश कोदे निसार शेख, वैदेही गुडेकर, बंडू ठाकूर, रिमेश चव्हाण, अनुप वारंग यांच्यासह शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता नसल्याने उपभियांत्याना संदेश पारकर यांनी जाब विचारला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे हा ठेकेदार काय तुमचा जावई आहे का अशी विचारणा यावेळी केली. तर सतीश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत एखाद्या कामाबाबत माहितीचा अधिकार टाकून देखील अंदाजपत्रकाबाबत माहिती हेच कार्यकारी अभियंता देत नाहीत. मात्र कोट्यावधींचा भ्रष्टाचार या भागात कार्यकारी अभियंता केला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे छत्रपतींचा पुतळा कोसळलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यकर्त्यांना रोखले. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम विभागाला जबाबदार जाताना ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. सार्वजनिक बांधकाम विभागाचा धिक्कार असो.. कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करा.. पालकमंत्री राजीनामा द्या.. अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले.