गावाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम
सावंतवाडी : तळवडे गावासह ग्रामपंचायतीबाबत आस्था असल्यानेच आम्ही ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. गावात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला असताना या विषयावर तुम्ही मुग गिळून गप्प का होता. या प्रकरणामागे कोणती अदृश्य शक्ती होती, असा पलटवार करतानाच तर हा विषय भावनिक करण्याचा तुमचा प्रयत्न तळवडे गावातील जनता हाणून पाडेल, असा टोला माजी सभापती पंकज पेडणेकर व ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी लगावला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, मंगलदास पेडणेकर, सुरेश मांजरेकर,रामचंद्र गावडे, श्यामसुंदर कुमार, श्याम शेटकर, उदय शिरोडकर, विनोद गावडे, वासुदेव जाधव, नीलकंठ नागडे आदी उपस्थित होते.
तळवडे गावात झालेल्या भ्रष्टाचाराशी आमचा कोणताही संबंध नाही असे सांगून हात झटकणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाला खास कोकण भवन मधून मागून घेतले त्याचबरोबर त्याचा गावात सन्मान केला होता. ग्रामपंचायत सत्ता बसताना दोन्ही गटाचे सदस्य हे शिवसेनेमधूनच निवडून आले होते त्यावेळी मंदिरात जाऊन त्यांनी आलेली सत्ता ही आमचीच आहे. आमचाच सरपंच बसवला असा दावा करून त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला होता. आता त्या ठिकाणी अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमचा काही संबंध नाही असे सांगून ते आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी पंकज पेडणेकर यांनी केला.
पंकज पेडणेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही नेहमी गावाच्या हितासाठी व गावाच्या सोबत राहिली आहे. ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारामध्ये गावाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. तळवडे गावाने मला सरपंच व पंचायत समिती सभापती पदापर्यंत नेऊन ठेवले. गावाने मला वेळोवेळी सन्मान दिला त्यामुळे गावाच्या हितासाठीच आम्ही हा भ्रष्टाचार उघड केला आहे. भ्रष्टाचार उघड होण्यासाठी आवश्यक ते वेळोवेळी पाठपुरावा केला. तालुका स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्व गोष्टी केल्या परंतु या ग्रामपंचायत बाबत जर तुम्हाला आस्था होती तर तुम्ही या प्रश्नाबाबत आजपर्यंत गप्प का राहिलात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादा परब म्हणाले, झालेल्या अपहाराबाबत आम्ही आयत्यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही किंवा टीका केली नाही. याबाबत वेळोवेळी आम्ही जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे तक्रार केली होती. नियोजन समितीचे सदस्य महेश सारंग यांचे सुद्धा लक्ष वेधले होते यावेळी माफी मागून हा प्रकार मिटवण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर भावनिक मुद्दा करून तसेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी करत शिवसेनेचे सदस्य लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दादा परब यांनी केला.
पोट ठेकेदारी मिळाली नसल्यानेच या प्रकरणांमध्ये आमचा हात असल्याचाही आरोप केला गेला आहे. मात्र, उगाचच बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. पोट ठेकेदारीशी आमचा कुठलाही संबध नाही. केवळ गावासाठी मंजूर झालेला पैसा हा गावात खर्च व्हावा व गावाचा विकास व्हावा या एकाच उद्देशाने आम्ही गावात झालेला भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.