रक्षाबंधन सणानिमित्त कुणकेश्वर मंदिर येथे निर्माण केलेला सेल्फी पॉईंट लक्षवेधी
देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी पूजेचा मान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना देण्यात आला होता. यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची विधिवत पुजाअर्चा झाल्यानंतर शिवभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. तिसऱ्या सोमवारी देखील सकाळपासूनच देव दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
दरम्यान पहाटे जिल्हाधिकारी यांच्याकडून पूजा आटपल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संतोष लब्दे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खजिनदार अभय पेडणेकर, विश्वस्त संजय आचरेकर, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर,कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाडी, विश्वनाथ भुजबळ, मंडल निरीक्षक बावसकर अन्य उपस्थित होते.
भजन प्रेमी मंडळींनी देखील सकाळपासूनच कुणकेश्वर मध्ये आपली उपस्थिती आपली भजन कला सादर करण्यासाठी लावलेली होती.तिसरा श्रावण सोमवार आणि या दिवशी भाऊ बहिणीच्या सणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सण असल्याने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वर मंदिर येथे रक्षाबंधन सेल्फी पॉइंट निर्माण करण्यात आला होत्या.या ठिकाणी बऱ्याच बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधून शिवतीर्थावर रक्षाबंधन सण साजरा केला.तर रक्षाबंधन करताना काहींनी फोटोसेशन देखील केले. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून निर्माण केलेल्या सेल्फी पॉइंट बद्दल कुणकेश्वर देवस्थानचे विशेष आभार व्यक्त केले.
श्री देव कुणकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत चोख व्यवस्था कुणकेश्वर देवस्थान, कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या वतीने घेण्यात आली होती.