सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगांव येथे अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असतानाच काल रात्री ओटवणे येथे देखील एका कुटुंबाला अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली. एकाच कुटुंबातील तिघाजणांना त्याचा त्रास जाणवला. त्यांना त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.
सध्या अळंबीचा हंगाम असून अनेक ठिकाणी शेतात तसेच जंगलात अळंबी आढळून येतात. ही अळंबी अत्यंत चवदार असल्याने ती आवडीने खाल्ली जातात. बाजारातही शेकडो रुपये या अळंब्यांची किंमत असते.अनेकजण विकत घेऊनही अळंबी खातात.
मात्र, शेतात तसेच जंगलात काही ठिकाणी सापडणारी अळंबी ही विषारी देखील असतात. अशाच प्रकारे अळंबी खाल्ल्याने ओटवणे येथील एकाच कुटुंबातील तिघांना त्याचा त्रास झाला. ईशा रामचंद्र सोनार (२२) प्रकाश लक्ष्मण सोनार (६०) व रामचंद्र विष्णु सोनार (५५ ) या तिघांना अळंबी खाल्ल्यानंतर उलटी व जुलाब सुरू झाल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील प्रकाश व रामचंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गोवा बांबोळी येथे उपचार घेत असलेल्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.