शिक्षण विभागाकडून संकेतस्थळावर यादी जाहीर
सिंधुदुर्ग : खाजगी शाळांमध्ये 25% विद्यार्थी कोटा राखीव असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये १२० विद्यार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड झाली आहे. या शाळांमध्ये २९३ जागा राखीव होत्या. एक किलोमीटर मधील अंतरावर असणाऱ्या खाजगी शाळेत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता मोफत प्रवेशासाठी हा कोटा राखीव होता. या धोरणाची यापूर्वी व्यापक प्रसिद्धी होणे आवश्यक होते. त्यामुळे या कोट्यातील काही जागा रिक्त राहिल्या आहेत.
केंद्र सरकारचे शिक्षण हक्क धोरणातील तट्टूदीनुसार 25% प्रवेश अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरक्षित जागांसाठी 120 विद्यार्थ्यांची निवड झाली असून दिनांक २३ जुलै २०२४ पासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू होत आहे.
या धोरणानुसार आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी आज (दिनांक २० जुलै २०२४) https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 45 शाळांमध्ये 120 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45 पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी 293 जागा उपलब्ध होत्या. या प्रवेशासाठी पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर आज (दिनांक १९ जुलै २०२४) रोजी अंतिम निर्णय दिला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी शनिवारी, दिनांक २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45 Rte प्रवेश देणाऱ्या शाळांमधून 293 जागासाठी 163 एकूण अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 120 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार (दिनांक २२ जुलै २०२४ पासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरुवात होईल.
प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रति घेऊन जावे. समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. गणपती कमलकर यांनी केले आहे.