3 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

कोकण रेल्वे मार्गावर मालपे बोगद्यात चिखल व पाणी | कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील मालपे ( पेडणे-गोवा) बोगद्यात पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. तसेच गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्यात. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बोगद्याच्या खालून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने रुळावर चिखल स्थिती झाली. ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती पेडणे रेल्वे स्थानकावर दिल्यानंतर तातडीने सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्यात. सायंकाळी उशिरा बोगद्यात रेल्वेचे इंजिनिअर दाखल झाले होते.  रेल्वे स्टेशन वरून मात्र अधिकृत कोणतेही माहिती देण्यास कर्मचारी नकार देत होते. दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकावर गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा होत नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल झालेत.

पेडणे मालपे येथील बोगद्यात मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे बोगद्यातील रेल्वे रुळावर सर्वत्र चिखलमय स्थिती निर्माण झाली. तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पेडणे स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर सर्व रेल्वे गाड्या थांबविण्याचा निर्णय कोरे प्रशासनाने घेतला.

सायंकाळी उशिरा कोरेचे अभियंता घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून कोरे प्रशासनाला काय अहवाल दिला त्याची माहिती मिळू शकली नाही. स्टेशन मास्तरांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मंगला एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकावर ५.३० वाजल्यापासून थांबवण्यात आली होती. तेजस एक्सप्रेस कुडाळ रेल्वे स्थानकावर तर जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकावर थांबून ठेवण्यात आली होती. कोचीवेल्ली एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर थांबवून ठेवली होती. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाली.

तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसात मालपे बोगद्यात असाच प्रकार झाला होता. त्याचा विपरीत परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. तब्बल तीन दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोरे प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र तशी खबरदारी प्रशासनाने घेतली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

प्रवाशांचे अतोनात हाल

मालपे बोगद्या त झालेल्या घटनेमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. स्टेशन प्रमुखांशी बाचाबाची झाल्याचे प्रकारही घडले. रेल्वे प्रशासनाकडून मात्र कोणतीही अद्ययावत माहिती प्रवाशांना दिली जात नसल्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!