कुडाळ मध्ये वीज ग्राहकांचा जनता दरबार ; ग्राहकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा
कुडाळ : राज्य सरकार आणि आयोग या दोघांची जरब महावितरण कंपनीवर असली पाहिजे. पण वीज नियामक आयोगाचा धाक आज कोणालाच नाही. या उलट महावितरण कंपनी मालक झालेली आहे. या कंपनीचा सरकारमधील ऊर्जा विभाग उजवा हात आणि आयोग डावा हात झाला आहे, मालकी महावितरण कंपनीकडे आहे. अशा प्रकारे गेली ७-८ वर्ष काम सुरु आहे. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. त्यामुळे आयोग हि यंत्रणा प्रबळ झाली पाहिजे असे आग्रही मत महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने आज वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुडाळ येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रताप होगाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सिंधदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने आज वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुडाळ येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक मेटाकुटीला आला आहे. या वीज ग्राहकांना संघटित करून त्यांच्या समस्या एकत्रित जाणून घेण्यासाठी कुडाळ मध्ये हा वीज ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी यावेळी वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांच्या समस्यांचे समाधान केले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, आफरीन करोल आदी मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वच वीज ग्राहकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वीज बिलातील त्रुटी, नवीन वीज कनेक्शन, नादुरुस्त मीटर, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा, उद्योगधंद्यांना वीज पुरवठा करण्याची मानसिकता नसणे, स्मार्ट मीटर अशा आईंक तक्रारी वीज ग्राहकांनी मांडल्या. त्याला प्रताप होगाडे यांनी उत्तरे दिली. स्मार्ट मीटर मोफत बसवून देण्यात येतील ही महावितरणची बकवास जाहिरात असल्याची टीका प्रताप होगाडे यांनी केली. या मीटरची किंमत 12 हजार रुपये आहे. ते पैसे ग्राहकांकडून वसूल करणार. खरतर वीज मीटर प्रीपेड घ्यायचा की पोस्टपेड, याचा अधिकार ग्राहकांना आहे. वीज मंडळाकडे अर्ज देऊन पोच घ्या, कोणी तुमचा मीटर बदलणार नाही, असे होगाडे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेण्यात आली. तसेच यांनतर रत्नागिरीच्या वीज अधिकाऱ्यांची आणि प्रकाशगड येथील अधिकाऱ्यांची भेट घेणार, प्रकाशगड येथील उच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर जिल्ह्यातील समस्या घालणार, त्याचबरोबर मंत्रालयस्तरावर बैठक आयोजित करणार, आणि गणेश चतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील ४३१ ग्रा.प. मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी सांगितले.
व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी सुद्धा १९१२ या टोलफ्री क्रमांकाबाबत माहिती देऊन त्याचा वापर करा ७० टक्के समस्या मिटतील असे सांगितले. नंदन वेंगुर्लेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन निखिल नाईक यांनी केले. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे नूतन सचिव म्हणून सावंतवाडी येथील दीपक पटेकर यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून वीज ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते. .