सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन वरील अपुऱ्या प्रवासी निवारा शेड चे काम पूर्ण करणे गरजेचे
भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खा.नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
कणकवली : सध्या कोकणात येण्यासाठी मध्य रेल्वे कडून ट्रेन सुरू आहेत. परंतु कोकणातील बहुसंख्य प्रवासी पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड पासून ते बोरिवली पर्यंत राहतात. त्यामुळे प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी दादर किंवा ठाणे येथे ट्रेनसाठी यावे लागते. त्याचप्रमाणे प्रवास करणारे काही प्रवासी हे दिव्यांग, वयोवृद्ध असल्याने मध्य रेल्वेकडे येताना फार त्रास होत असतो. मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे येथून कोकणासाठी ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल, अशी मागणी भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनच्या प्रवासी शेडबाबत देखील खा. नारायण राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. त्या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. परंतु रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील प्रवासी शेडचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात व पावसाळ्यामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्लॅटफॉर्मवर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना ट्रेनच्या डब्यामध्ये चढताना लांबचे अंतर गाठावे लागते. तसेच दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांना याचा त्रास देखील होत आहे, असे श्री. सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.