कणकवली : मे महिन्याची सुट्टी संपली अन् आता शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुलांना शाळेसाठी लागणाऱ्या शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांसह मुलांची दुकानामध्ये लगबग सुरू आहे. मात्र शालेय साहित्यांच्या किंमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालकांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी शाळा आजपासून जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होताना नवी कोरी पुस्तके, वह्या, स्कुलबॅग आदी साहित्य हवे असा मुलांचा हट्ट असतो. त्यामुळे मुलांच्या आवडीनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी उपलब्ध केले आहे. पाऊस सुरू होण्याआधी साहित्य खरेदी केले जावे या उद्देशाने पालक व मुले खरेदीसाठी घाई करत आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी होत आहे. मुलांना त्यांच्या आवडीचे साहित्य वेळेत मिळावे यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. बदलत्या काळानुसार मुलांच्या आवडी-निवडी बदलत्या आहेत.
त्यामुळे वह्या, छत्री, रेनकोट, कंपास पेटी, लंच बॉक्स, वॉटरबॉटल आदी वस्तूंची खरेदी करताना त्यामध्ये नव्या आकर्षक पद्धतीने बनवलेल्या वस्तूंना अधिक मागणी आहे. अभ्यासात कोणत्याही बाबतीत मुलांना काही कमी पडू नये, यासाठी पालकही काटकसर करून विद्यार्थ्यांची हौस पूर्ण करत आहेत. शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थ्यांनाही नवा वर्ग, मित्रांच्या भेटीची उत्सुकता लागलेली आहे. दुसरीकडे पालकांना केवळ शाळेचे साहित्य नव्हे, तर शाळेत सोडण्यासाठी असणारी वाहने, शाळेचे शुल्क आणि अन्य खर्च करावा लागणार आहे. यंदा बाजारपेठेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, निसर्ग यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगांच्या, कार्टुनची चित्रे असणाऱ्या व विविध आकाराच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत.
वस्तूंच्या किमती पुढील प्रमाणे : मुलांचा गणवेश – ५०० रुपयांपासून, १०० पेजेस वह्या (डझन) – २०० ते ३५० रुपये, १०० पेजेस वह्या (डझन) – ३०० ते ५०० रुपये, ए फोर साईज १०० पेजेस वह्या (डझन)- २५० ते ५०० रुपये, ए फोर साईज २०० पेजेस वह्या (डझन)- ६०० रुपये, कंपास पेटी – १०० रुपयांपासून पुढे, स्कुल बॅग- ३०० ते १,५०० रुपये, छत्री- ३०० रुपयांपासून पुढे, रेनकोट- ३५० ते २ हजार पर्यंत असे किमती शालेय साहित्याचा आहेत.