नागपूर : नागपूरमध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं असून या सगळ्याची सूत्रधार त्यांची सूनच आहे. तिनेच ड्रायव्हरच्या माध्यमातून सासऱ्याच्या हत्येची १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. अर्चना पुट्टेवार हिच्यासह तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.
नागपूर हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली होती. तर ड्रायव्हर सार्थक बागडे हा फरार होता. पोलिसांनी या प्रकरणात पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना हिला अटक केल्यानंतर सार्थक बागडेलासुद्धा अटक केली. पोलिस तपासात या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत.
बालाजीनगर परिसरात २२ मे रोजी भरधाव कारने पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसत होतं. मात्र या प्रकरणात अधिक तपास केला असता पोलिसांना हा घातपात असल्याची शंका आली. त्यानंतर अधिक तपास केला असता सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं.
पुरुषोत्तम यांची सून अर्चना ही क्लास वन अधिकारी आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्या कार्यरत असून पुरुषोत्तम यांच्या ३०० कोटींच्या संपत्तीसाठी त्यांनी हा हत्येचा कट रचल्याचं समोर आलं. अर्चनाचा पती डॉक्टर आहे. तर पुरुषोत्तम पुट्टेवार हेसुद्धा डॉक्टर होते. पुरुषोत्तम यांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी तिने हा घातपात केल्याचं समोर येताच खळबळ उडाली आहे.
पुट्टेवार यांच्या कुटुंबातच ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सार्थक बागडेला हाताशी धरून सून अर्चना हिने हत्या करण्याचा प्लान आखला. अपघात असल्याचं दाखवून हत्या करण्यासाठी सेकंड हँड कारही खरेदी केली. यासाठी अर्चना हिने लाखो रुपयेसुद्धा दिले. या सगळ्या प्रकरणी अर्चना हिने कबुलीसुद्धा पोलिसांकडे दिलीय.