मालवण : तालुक्यातील खोटले येथून बेपत्ता असलेली ७७ वर्षीय वृद्ध महिला थेट गुजरात राज्यातील सुरत याठिकाणी सापडून आली आहे. मालवण पोलिसांनी तिचा शोध घेत तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे. सध्या सदरची महिला ही सुरत येथील दिडोंली महादेवनगर येथील वृद्धाश्रमात असून ती सुखरुप आहे. तिला मालवण येथे आणण्यासाठी मालवण पोलिसांचे पथक नातेवाईकांसह रवाना होणार आहेत.
मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भातील तपास कार्य करण्यात आले. २८ मे २०२४ रोजी खोटले येथील दिलीप साबाजी परब (५८) यांनी सिंधु विठ्ठल परब (७७) वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत सर्वत्र याची माहिती दिली होती. यानंतर गोद्रा पोलीस ठाणे, सुरत राज्य-गुजरात येथील पोलीस कर्मचारी दमयंती गोसावी यांनी मालवण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून सिंधु विठ्ठल परब ही महिला त्यांच्या पोलीस ठाणे हद्दीत मिळून आलेली असून तिला सध्या सुरत, दिडोंली महादेवनगर येथील वृद्धाश्रमात ठेवण्यात आलेले आहे, असे सांगितले. तसेच महिलेने आपण गाव खोटले ता. मालवण येथील असल्याचे सांगत आहे, असेही सांगितले. यावरून तपास शोध सुरू करण्यात आला आणि मालवण पोलिसांनी दाखल असलेल्या बेपत्ता रजिस्टरवरून महिलेची माहिती सुरत पोलीस ठाण्याला दिली.
कट्टा पोलीस दूरक्षेत्रचे हेड कॉस्टेबल मोरे यांनी याबाबत वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. तसेच सुरत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच एक पथक त्याठिकाणी जाऊन महिलेला ताब्यात घेणार आहेत.