कोकणात मान्सून दाखल, पण आमच्या गावात पाऊस पोहोचलाच नाही
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : उकाड्याने हैराण झालेले नागरिक, पाणी टंचाईने चिंतेत असलेली जनता मान्सून आलाय या आनंदाने बहरुन गेली आहे. मृग नक्षत्राच्या पुर्वीच तो दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मात्र गुरुवारी दिवसभर सिंधुदुर्गात काही तुरळक ठिकाणी पाऊसाची हजेरी वगळता हवामान विभागाच्या रडारवर दिसणारा मान्सून खेडोपाडी पोहोचलाच नव्हता. आता शेतकऱ्याची भिस्त मृग नक्षत्रावर आहे. ७ जून पासून मृग नक्षत्र सुरु होत आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे.
तळकोकणात ‘मिरग’ म्हणून प्रसिध्द असलेल्या मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर शेतकरी वरुण राजाची पूजा करतो. काही ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. या मुहुर्तावर पाऊस दमदारपणे सर्वदुर सुरु होईल अशी त्याची भिस्त आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून पावसाने गावागावात हजेरी लावल्यानंतर पेरणीची लगबग शेतकऱ्याची सुरु झाली आहे. गुरुवारी आकाश अंशतः ढगाळ होते. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झालं आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईसह राज्याचा अन्य भाग व्यापण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले.
हवामान विभागाने १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
याआधी १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि ४८ तासात कोकणात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.