कोकणाचा १० वर्षाचा “बॅकलॉग”नक्कीच भरून काढू
रत्नागिरी | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना आपटले, आता वैभव नाईक यांचा नंबर आहे. त्यांनाही येणाऱ्या विधानसभेत त्यांची जागा दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी दिली. केवळ नारायण राणेंना विरोध करून या ठिकाणी आपले राजकारण करायचे ही ठाकरे शिवसेनेची पद्धत आहे. त्यामुळे त्यांना लोकांनी घरी बसवले. परंतु आता गेल्या १० वर्षाचा “बॅकलॉग” नारायण राणे यांच्या माध्यमातून भरून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्या विजयानंतर निलेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, त्या ठिकाणी नारायण राणे यांना विजयी करून देणाऱ्या सर्व मतदारांचे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी नारायण राणे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा येणार आहे. हे माहित असल्यामुळे येथील जनता त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. कोकणावर नारायण राणेंनी नेहमीच प्रेम केले आहे. त्यामुळे त्याची नक्कीच परतफेड केली जाईल. येणाऱ्या काळात कोकणचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. गेल्या १० वर्षात कोकणात फक्त आश्वासने देण्याचे काम झाले. प्रत्यक्षात काही झाले नाही. मात्र आता तो “बॅकलॉग” भरून काढला जाईल, असे ते म्हणाले.