प्रशासनाविरोधात आंदोलने सुरू
कणकवली : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा पराभव निश्चित झाला आहे. त्यामुळे सत्तेत असलेले भाजप व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करत आहेत. या सर्वांना आता विरोधी पक्षात बसायची जाणीव झाली आहे अशी टीका माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज केली. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, देशासह रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव निश्चित झाला आहे. याची कुणकुण भाजप आणि सत्तेत असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते आता पोलीस यंत्रणा, महावितरण व इतर प्रशासकीय यंत्रणांच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊ लागले आहेत. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांची ही आंदोलने म्हणजेच या निवडणुकीत आपला पराभव अटळ आहे. पुढील काळात आपणाला विरोधी पक्षात बसायचे आहे याची जाणीव झाल्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. सावंतवाडी मध्ये किंवा कुडाळ मध्ये असेल शिवसेना व भाजपचे अनेक पदाधिकारी महावितरणच्या विरोधात आंदोलने करताना दिसतात. अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की सत्ताधारी पक्षाचे जे तीन तीन मंत्री या जिल्ह्यात आहेत त्यांच्यावर या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला नाही. उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील लोकांसाठी हे मंत्री काहीच करू शकत नाहीत याची जणू खात्री पटल्याने हे पदाधिकारी व कार्यकर्ते आता विरोधी पक्षाप्रमाणे काम करत आहेत. राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षांनी गेल्या काही वर्षात जनतेच्या विकासात्मक दृष्ट्या कोणतेही काम केलेले नाही. सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात या सत्ताधाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. पुढील काळात आपणाला विरोधी पक्षातच बसायचे आहे याची पूर्णतः जाणीव झाल्याने जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात पावले उचलत आहेत.