कणकवली : जमिनीची मोजणी नाही, मोबदला नाही तसेच प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता सुरू करण्यात आलेले सावडाव धरणाचे काम आज येथील ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन रोखले. यावेळी ठेकेदार आणि जलसंधारण अभियंत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पुन्हा धरणाचे काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सावडाव धबधब्यापासून काही अंतरावर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने लघु धरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथील जमिनीची, त्यामधील झाडे व इतर मालमत्ता यांची नोंद घेण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्तांनाही कुठल्याही नोटिसा पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या सावडाव येथील ग्रामस्थांनी धरण काम सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढला. तेथील माती उपसा काम बंद पाडले. तसेच डंपर, जेसीबी व इतर यंत्रणाही बाहेर जाण्यास भाग पाडल्या.
यावेळी सावडाव धरण प्रकल्पग्रस्त वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सावडाव धरण कामाला आमचा विरोध नाही, मात्र प्रकल्पग्रस्तांची किती जमीन त्यात बाधित होणार आहे आणि बाधित जमिनीचा मोबदला केव्हा देणार याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. ठेकेदाराला हाताशी धरुन अधिकारी येथील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करत आहेत, असा आरोप यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केला.