सर्वसामान्य नागरिकांना आता तरी न्याय द्या, एवढीच माफक अपेक्षा
१३ वर्षे पडलेल्या भिजत घोंगड्यामुळे प्रवासी त्रस्त
कणकवली : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मालवण येथील नोसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाने ज्या ‘गती’ने काम केले, ती गती सामान्य जनतेच्या कामासाठी असावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. किंबहुना तशी अपेक्षाही करणे चुकीचेच आहे. परंतु, एखादे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वर्षानुवर्षांचा कालखंड लागत असेल, तर त्यासाठी सातत्याने पाठ्पुरावा आणि प्रयत्न करणाऱ्यांना ‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे म्हणण्याची वेळ येण्याअगोदर ते व्हावे, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणूनच कारणे कितीही असतील आणि ती १०० टक्के रास्तही असतील, तरीही हळवल रेल्वे फाटक येथील उड्डाण पुलाबाबत गेली १३ वर्षे सातत्याने मागणी व पाठपुरावा करणाऱ्यांची या त्रासातून ‘सुटका’ कधी होणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या हळवल फाटकादरम्यानचे उड्डाण पूल व संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. गतवर्षी रेल्वेकडून बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन मोजणी झाली व यासाठी भूसंपादन प्रस्ताब महसूलकडे सादर झाला. परंतु, हे करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे रेल्वेकडून स्थानिक वाहनांच्या वाहतुकीसाठी बांधलेला उड्डाण पूल व त्यामुळे जोडरस्ता झाल्यास अधिक धोके उद्भवू शकतात. उड्डाण पुलाला हळवल व कसवणच्या दिशेने रस्ता काढताना निर्माण होणारी रस्त्याची स्थिती अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्याय सूचविला आहे. याबाबत त्यांचे निश्चित कौतुक करायला हवे.
पण प्रश्न एवढाच उरतो, की गेली १३ वर्षे या जोडरस्त्यासाठी संपादन व इतर प्रक्रिया करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने का पाहिले नाही? जमीन मोजणीनंतर दुसरी गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जमीन संपादनापासून येणारा खर्च याचा विचार करता, सध्या हळवल रेल्वे फाटक असलेल्याच ठिकाणी उड्डाण पूल बांधल्यास कमी खर्चात व वेळेत काम होऊ शकते, ही बाब लक्षात येऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे यापुढील काळात हे काम गतीने व्हावे, अशी सर्वसामान्यांची असलेली अपेक्षा ग्रास्तच म्हणायला हवी.
दुसऱ्या बाजूने विचार केला, तर हळवल फाटकावर प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोईबाबत रेल्वेकडून फाटकापासून काही अंतरावर स्थानिक वाहतुकीसाठी उड्डाण पूल बांधण्यात आले. पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर हे उड्डाण पूल बांधण्यात आले. त्याला आता १३ वर्षे झाली. मात्र, त्यासाठी जोडरस्त्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात आल्याचे दिसलेच नाही. त्यासाठी ११८ गुंठे जमीन जोडरस्ता करण्यासाठी संपादित करावी लागणार, कणकवलीहून हळवलकडे व कसवणकडे जाणाऱ्या रस्त्याचा विचार करता, सध्या रेल्वेकडून उभारण्यात आलेले उड्डाण पूल हे एकेरी वाहतुकीसाठी योग्य आहे. परंतु, दुहेरीसाठी भविष्यात दुसरे उड्डाण पूल बांधावे लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच रेल्वेने बांधलेल्या उड्डाण पुलाच्या ठिकाणी जोडरस्ते व भूसंपादन या साऱ्याचा विचार केला, तर सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांपर्यंत खर्च जाऊ शकतो. या उलट सध्याच्या फाटकाच्या ठिकाणीच उड्डाण पूल उभारले, तर भूसंपादन न करता, किमान १० ते १२ कोटींमध्येच काम होऊ शकते, असा प्रस्ताव जरी पुढे आला, तरीही या कामाने आता गती घ्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कारण प्रशासकीय कामकाज पद्धतीच्या आदर्श नमुन्यात गेली १३ वर्षे हा प्रश्न भिजत घोंगड्याप्रमाणे पडून आहे.
सद्यस्थितीत हळवल येथील रेल्वे फाटकाच्या समस्येमुळे सामान्य प्रवासी, नागरिक त्रस्त आहेत. म्हणूनच या प्रश्नाबाबत रेल्वे प्रशासनासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व राज्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे. कारण याबाबतची कार्यवाही वेळेत न झाल्यास व पुढील काळात अधिकारी बदलले, तर पुन्हा प्लान बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न असाच भिजत न टेवता जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्यकर्त्यांनी तातडीने पावले उचलून आता उड्डाण पुलाच्या अंतिम ‘मार्गा’ला मूर्त स्वरुप द्यावे.