वैभववाडी : अज्ञात चोरट्यांनी आखवणे – भोम पुनर्वसन गावठाणतील पाच बंद घरे फोडली आहेत. एका घरातील सुमारे १८ हजार रुपये रोख तसेच विठ्ठल रखुमाई देवाची चांदीची मूर्ती अंदाजे १६ हजार ८०० किंमतिची चोरून नेली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत दत्ताराम सीताराम नागप यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार दिली आहे. चार घरांचे मालक मुंबईला असल्यामुळे त्यांच्या घरातून चोरट्यानी नेमके काय चोरून नेले आहे. हे समजू शकले नाही. भरवस्ती एकाच वेळी पाच घरांची झालेल्या घरफोडी मुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारेपाटण गगनबावडा राज्य मार्गाला लागून आखवणे भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाण आहे. या गावठाणातील बंद घरांना चोरट्यानी टार्गेट केले आहे. मात्र दत्ताराम सीताराम नागप हे चार दिवसापूर्वी गावी आले होते. ते वारकरी व कीर्तनकार असल्यामुळे रविवारी सायंकाळी घर बंद करून भोम येथे किर्तनसाठी गेले होते. रात्री कीर्तन आटपून ते मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांनी पुढचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना हॉलमधील देवघरातील सामान व टीव्ही शोकेस मधले सामान विस्कटलेले दिसले.आतल्या खोलीत गेल्यानंतर मागच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. तसेच बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील रोख रक्कम १८ हजार व विठोबा रुक्मिणी देवाची चांदीची मूर्ती चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या आले. मात्र घरातील कपडे,भांडी कुंडी, टीव्ही व इतर साहित्याला चोरट्यानी हात लावलेला नाही. त्यांनी याबाबत त्यांचे शेजारी असलेले उपसरपंच आकाराम नागप यांना माहीती दिली. त्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी बाजूला असलेली बंद घराची पाहणी केली असता. मधुकर अनंत नागप, सुरेश पुनाजी नागप यांचे दोन बंद बंगले, तर स्वप्नाली सुरेश नागप, अंकुश विठोबा नागप यांची दोन घरांच्या पुढच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घर फोडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. घर फोडी बाबत पोलीस पाटील प्रल्हाद पावले यांना माहिती देण्यात आली. रात्रीच ग्रामस्थांसह वैभववाडी पोलीस ठाणेत येऊन पोलिसांत तक्रार दिली.
वैभववाडी पोलिसांनी सोमवारी पहाटे घटना स्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक असिफ बेग, पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील, संदीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथक, व ठसे तज्ञाना पाचरण केले. दुपारी ११.४५ वा. श्वान पथक व ठसे तज्ज्ञचे पथक घटना स्थळी दाखलं झाले.
या पथकामध्ये हे कॉ. सुमित देवळेकर, निखिल चव्हाण, लुईस फर्नांडीस यांचा समावेश होता. श्वान दत्ताराम नागप यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूकडून बाजूच्या घराच्या अंगणातून सरळ घरफोडी झालेल्या मधुकर नागप यांच्या घरात व तिथून सरळ गावठाणातील अंतर्गत रस्त्याने पुढे जाऊन परत मागे आला. तर ठसे तज्ञांनी दत्ताराम नागप यांच्या घरातील ठसे घेतले आहेत.
दत्ताराम नागप यांच्या घरातील सोन्याचे दागिने ठेवतात त्या डब्या कपाटाची चावी व पाण्याची बॉटल घरा शेजारी असलेल्या शेड जवळ उघडून टाकलेल्या आढळून आल्या.
तर अनंत नागप हे मुंबईला असून त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या घरातील कपाटातील दीड लाख रुपये चोरीस गेले आहेत.तर अन्य घरातून काय चोरीस गेले ते समजू शकले नाही.