कणकवली : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला सध्या वाढती मागणी आहे. माठामध्येही विविध प्रकार असून, लाल माती, काळी माती, चिनी मातीचे माठ बाजारात विक्रीला आले आहेत. निरनिराळ्या आकारातील, नळ असलेले-नसलेले, रंगसंगती, डिझाईनचे माठ विक्रीसाठी उपलब्ध असून, माठाप्रमाणे दरही भिन्न आहेत. चोखंदळ ग्राहक मात्र लवकर ज्या माठात पाणी थंड होईल ते पाहून माठाची खरेदी करत आहेत,
सध्या जिल्ह्यातील तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सियस आहे. दिवसभर कडकडीत ऊन असल्याने घराबाहेर पडणे अवघड होत आहे. उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून, शरीरातील पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे डोक्यावर टोपी, रूमाल व जवळ पाण्याची बाटली ठेवून बाहेर पडणे योग्य आहे.
माठाला असलेल्या छिद्रामुळे आतील गरमपणा छिद्राद्वारे बाहेर टाकला जातो व माठातील पाणी थंडगार होते. थंड होण्याची प्रक्रिया वेगाने होते. शिवाय जास्त वेळ पाणी थंड राहते.
सध्या ग्रामीण भागातील नागरिक माठ खरेदी करून त्यातील थंडगार पाण्याने शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दिवसेंदिवस उष्म्यात वाढ होत आहे.