कणकवली : शिवकालीन युगात महिला व पुरुष स्वतःच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी युद्ध कला आत्मसात करत. या कलेच्या जोरावर शिवरायांच्या मावळे आणि रणरागिनींनी रणांगण गाजवून शूत्रंना गुडघे टेकायला लावल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्ध कलेवर आपल्या मावळे व रणरागिनींनासोबत स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापनेत महत्त्वाच्या योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून आळखले जाते. याच खेळाची परंपरा टिकवण्याचे काम कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील एसएसएस (सिद्धिविनायक संस्कार शिबिर) योद्धा पथक वन प्लस करीत आहे. हे पथक मुलींना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देत त्यांना आधुनिक युगात स्वतःच्या सरंक्षणासाठी सक्षम बनवत आहे. मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीदेखील आपल्याप्रमाणे इतर मुलीही स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी सक्षम झाल्या पाहिजेत, हे ध्येय बागळून त्यांना मर्दानी खेळ आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. याशिवाय हे पथक जिल्ह्यात ठिकठिकाणी जावून मर्दानी खेळांची चित्तथराकर प्रात्यक्षिके सादर करून खेळांबाबत जनजागृती करीत आहेत. महाराष्ट्रात शिवकालीन युद्ध कला सर्वत्र प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एवेरणीवर आला आहे. ही परिस्थिती पाहून राष्ट्रवीर संघाचे प्रशिक्षक रवींद्र गव्हाणे व गजानन मगर यांच्या संकल्पनेतून आणि बिडवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून 2023 मध्ये सिद्धिविनायक संस्कार शिबिर या स्वयंसेवी संस्थेने कोकणात पहिल्यांदाच बिडवाडी येथे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर घेण्यास सुरुवात केली. यात मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत प्रशिक्षक रवींद्र गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थीनी लाठी-काठी, तलवारी बाजी, भालाफेक, दांडपट्टा चालविणे, शिवकालीन गुप्तहेरीची ‘करपल्लवी’ भाषा आदींचे प्रशिक्षण घेतले. या मुलींचे आता एसएसएस योद्धा वन फ्लस नावाचे पथक असून यात मृदुला मगर, दिव्या मगर, आर्या फोंडके, महेश्वरी लाड, अपर्णा चव्हाण, मिताली मगर, उर्वी तेली, श्रद्धा चिंदरकर, युगाक्ष मगर, वेदिका चव्हाण, निहारिका मगर, सायली राणे, श्वेता चिंदरकर यांचा समावेश आहे. या पथकाने आतापर्यंत मालवण तालुक्यातील रामगड येथील गडावर, कणकवली तालुक्यातील फोंडा, कलमठ, देवगड तालुक्यातील साळशी, जामसंडे, दहिबाव, विजयदुर्ग, दोडामार्ग तालुक्यातील कळणे, हनुमंत गडावर, सावंतवाडी तालुक्यातील मळगावात येथे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली आहेत. राष्ट्रवीर संघातर्फे बिडवाडी येथे कायमस्वरुपी व विनामूल्य प्रशिक्षण वर्ग दर शनिवार व रविवार घेतले जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील मुले-मुली येत आहेत. राष्ट्रवीर संघाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवेळी अशी शिबीर आयोजित करण्यासाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग’चेदेखील सहकार्य मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवकालीन मर्दानी खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून मुलींना आत्मसंरक्षणासाठी सक्षम बनवणे हा राष्ट्रवीर संघाचा हेतू आहे. लहान वयातच मुलांना शिवकार्याबद्दल आवड निर्माण व्हावी आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत. शालेय मुलींना स्वतःच संरक्षण स्वतः करता येण्यासाठी शिवकालीन मर्दानी खेळ शिकावेत यासाठी राष्ट्रवीर संघाचे रवींद्र गव्हाणे, गजानन मगर, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे दुर्गसेवक प्रमोद मगर हे प्रयत्नशील आहेत.
शिवकालीन ढोल, ताशा वाद्यांसह मर्दानी खेळांच्या परंपरेला ही अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे ही परंपरा कशी टिकवली जाईल, भावी पिढीच्या रक्तात कशी उतरवली जाईल, यासाठी राष्ट्रवीर संघ विशेष प्रयत्न करीत आहे. मर्दानी खेळांमध्ये अनेक प्रकाराचे खेळ आहेत, आत्मसंरक्षणाची नितीपण आहे. याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील मुली पुढे सरसावल्या आहेत. या मर्दानी कलेचा वापर करीत आधुनिक युगात मुली आत्मसंरक्षणासाठीही करताना दिसत आहेत. एसएसएस योद्धा वन प्लस पथकातील मुली स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या रणरागिनींचा वारसा पुढे नेत आहेत. पथकातील मुली जेव्हा नऊवारीसाडी नेसून आणि कपाळावर चंद्रकोर लावून ठिकठिकाणी मर्दानी खेळांची चित्तथराकर प्रात्यक्षिके सादर करतात तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांकडून मुलींचे कौतुकही केले जाते. दरम्यान, मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेतल्याने मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात, असा विश्वास प्रमोद मगर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील ठिकाणी साजरे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये एसएसएस योद्धा पथक वन प्लसला मागणी आहे.