शिक्षण सोडाच खेळणे-बागडणेही हिरावून घेतलेय नियतीने ; हवीय साथ मदतीची
कणकवली – नियतीने तिचे बालपण, शिक्षण हिरावून घेतले. बालपणातच हृदयशस्त्रक्रिया झाली. परंतु, शिक्षण घेण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच तिला अनेक समस्या जाणवू लागल्या. नियतीने दिव्यांगत्व दिले, तरीही आई-वडिलांनी तिच्यावर उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, हे प्रयत्नही याच नियतीला पाहवले नाहीत अन् तीन वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हिरावले गेले. घरी कमविते कुणी नाही, औषधोपचाराचा खर्च, घरखर्च हा सारा रहाटगाडा चालविताना तिच्या आईची, त्या माऊलीची होणारी ओढाताण हृदय हेलावणारी आहे. म्हणूनच समाजातील दानशुरांनी पुढे येत या कुटुंबाच्या आधारासह युवाच्या जीवनातील हा तिमीर तेजोमयतेकडे नेण्यासाठी मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे.
मूळ तालुक्यातील वाघेरी येथील युवा तानाजी राणे (१८) या दिव्यांग युवतीची ही कहाणी. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले. आई-वडिलांनी न डगमगता, तिच्यावर उपचार सुरू केले. मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. मात्र, जसजशी ती वाढू लागली, त्यावेळी तिच्यातील दिव्यांगत्व दिसून आले. मात्र, आई-वडिलांनी तिच्यावर उपचार सुरू ठेवले. वडील छोटी-मोठी कामे करत कुटुंबासह तिच्या उपचारांचा खर्चही सांभाळत होते.
दरम्यान, हे सारे सुरू असतानाच तीन वर्षांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने तानाजी राणे यांचे निधन झाले. साहजिकच ही सारी जबाबदारी येऊन पडली, ती त्यांची पत्नी साक्षी तानाजी राणे यांच्यावर. साक्षी राणे या दिव्यांग मुलीसह सासू व मुलाची सर्व जबाबदारी घेऊन काम करतात. त्यातच युवाच्या उपचारांसाठीचा खर्च वाढत जाऊ लागला. तिच्या अंगाला गेल्या पाच वर्षांपासून जखमाही होऊ लागल्या. त्यासाठीचा उपचार खर्च वाढत गेला. त्यातच तिला तपासणीसाठी मुंबईला नेणेही आता साक्षी राणे यांना कठिण झाले आहे. पतीच्या निधनांनतर त्या काही ठिकाणी खासगी कामे करून कुटुंबाचा चरितार्थ तसेच युवाच्या उपचाराचा खर्च सांभाळत होत्या. यावेळी युवाकडे लक्ष देण्याचे काम साक्षी यांच्या सासू करत होत्या. मात्र, आता युवा जसजशी मोठी होऊ लागली, तशी ती साक्षी यांच्या सासूंना ऐकेनाशी झालीय. त्यामुळे साक्षी यांना थांबूनच तिचे सर्व करावे लागते. त्यामुळे त्या कुठे कामधंदाही करू शकत नाहीत. यातच कुटुंबासोबतच सातवीत शिक्षण घेणारा मुलगा. या साऱ्यात करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
अशा स्थितीत कुटुंब चालविणे, मुलीच्या आजारपणासाठी औषधोपचार खर्च करायचा कसा, अशा अडचणीत सापडलेल्या साक्षी राणे यांना समाजातील दानशुरांनी मदत करण्याची नितांत आवश्यकता आहेत. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असून दानशुरांनी येथे मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जॉईंट अकाऊंट कु. युवा तानाजी राणे व साक्षी तानाजी राणे-अकाऊंट नं. ०४९४०००००००८००९, आयएफसी कोड-SIDC०००१०४९. मोबाईल-९४२२२९४६२४.