कोलगाव सरपंचासह पदाधिकाऱ्यांचा आरोप; पक्ष प्रवेशावरून शिवसेना-भाजपात जुंपली…
सावंतवाडी : जुगार तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल असलेल्या तसेच लिंबू-टिंबू आणि बुवाबाजींचा व्यवसाय असणाऱ्यांना कोलगावातील काहींना शिवसेनेत घेऊन संजू परब यांनी लोकांची दिशाभूल करणारा पक्षप्रवेश दाखवला आहे, असा आरोप भाजपचे पदाधिकारी व कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी केला आहे. दरम्यान महेश सारंग यांचे कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात काम चांगले आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर संजू परबांनी आगामी काळात कोलगाव जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढवून दाखवावी. फोडाफोडीचे राजकारण करून सारंग यांना बदनाम करू नये, असा इशारा दिला आहे. नुकताच श्री. परब यांनी कोलगाव येथील भाजप व ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला होता तसेच आगामी काळात मतदारसंघात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या प्रवेशानंतर कोलगावचे सरपंच संतोष राऊळ आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, शक्ती केंद्रप्रमुख संदीप हळदणकर, कुणकेरी उपसरपंच सुनील परब यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून संजू परब व त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, त्या दिवशीचा प्रवेश हा बिनबुडाचा व लोकांची दिशाभूल करणारा पक्ष प्रवेश होता. यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या अनेक व्यक्ती उपस्थितीतच नव्हत्या.काही जण शिवसेनेचे पूर्वीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संजू परब यांची रोजची स्टंटबाजी व दीशाभूल लोकांच्या समोर आली आहे. यातील शिंदे शिवसेनेचे काही पदाधीकारी हे आपले अनैतीक व्यवसाय टीकवण्याकरीता शिंदे शिवसेनेचा आसरा घेतलेला आहे. यातील दिसण्याऱ्या व्यक्ती हया फक्त दोन कुटूंबातील असून त्यांचा अनैतीक व्यवसायाशी संबंध राहीलेला आहे. यातील एक व्यक्ती म्हणजे यांच्यावर सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जुगार तसेच मारहाणी सारखे गुन्हे नोंद आहेत तसेच दुसरी अशी व्यक्ती आहे की तीचा लिंबू – टींबू बुवा बाजीचा व्यवसाय आहे. अशा लोकांना संजू परब नेहमीच आश्रय देण्याचा प्रयत्न करत असतात. नुकत्याच झोलल्या विधान सभेच्या निवडणूकीमध्ये जिल्हा बँक संचालक सारंग यांनी शिवसेनेचे विदयामान आमदार दिपक केसरकर यांना संपूर्ण विधानसभा मतदार संघामध्ये केलेली मदत आमदार दिपक केसरकर व संजू परब विसरले की काय? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे कोलगांव मतदार संघामध्ये गेले अनेक वर्षे श्री सारंग यांच्या कार्याचा झंझावत पहाता व केलेल्या विकास कामांच्या जोरावर कोलगांव जिल्हा परिषद मधील चारही ग्रामपंचायती या सारंग यांनी एक हाती भाजपच्या चिन्हावर निवडून आणल्या. त्यामुळे मतदार संघ हा सारंग यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीलेला आहे. त्यामुळे भाजपातील एकही कार्यकर्त्याने कधीच सारंग यांची साथ सोडलेली नाही व सोडणार ही नाहीत. संजू परब यांनी कोलगांव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्याकरीता केलेला हा खोटा पक्ष प्रवेश आहे. फोडा फोडीचे खोटे राजकारण करून सारंग यांच नांव बदनाम करण्याची हिंमत जर संजू परब यांचे मध्ये असेल तर त्यांनी कोलगांव मधून निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे.