कणकवली : तालुक्यातील ओसरगाव येथील महामार्गालगत असलेल्या एका मैदानी भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह जळलेल्या स्थितीत सोमवारी रात्री ११:४० ते १२:२० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओसरगाव चे माजी उपसरपंच बबली राणे हे रात्री कणकवलीच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांना घटनास्थळी आग पेटत असल्याचे दिसून आले. लागलीच बबली राणे यांनी ओसरगाव चे पोलीस पाटील यांना कळवले. व पोलीस पाटलांच्या मदतीने कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान यावेळी त्यांनी घटनास्थळाची पहाणी केली. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, एलसीबी चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी पोलिसांची विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे.
यावेळी जळालेल्या महिलेचा केवळ उजवा पाय गुडघ्यापासून शिल्लक राहिला होता. या पायात चांदीच्या धातुसारखी पैंजण सापडली, तर डाव्या पायाचा तळवा अर्धवट शिल्लक आढळून आला. हातात हिरव्या बांगड्या, पिवळ्या धातूच्या बांगड्या जळालेल्या स्थितीत आढळून आल्या. मृत महिलेची उंची साधारणपणे पाच फूट असण्याची शक्यता आहे. तसेच गळ्यात जळालेल्या अवस्थेत मंगळसूत्र आणि कानात पिवळ्या धातूची कर्णफुले आढळून आली. अशा वर्णनाची कोणी महिला व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा दिलेले वर्णन ओळखीचे असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आगीत जळून मृत झालेली ती नेमकी महिला कोण ? तिचा घातपात की आत्महत्या ? या महिलेचा घातपात करत तिला ओसरगाव मध्ये टाकले की कसे ? तसेच या महिलेला या ठिकाणी टाकण्यामागची नेमकी कारणे काय ? रात्री हा मृतदेह जळताना काहीनी पहिले, असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. एकंदरीत जर पाहिले तर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
*घटनेवरून सर्वत्र उडाली खळबळ*
आजपर्यंत अनेक घटना घडल्या मात्र ओसरगाव येथे उगजडे झालेल्या घटनेप्रमाणे अन्य कोणतीही घटना आजपर्यंत घडली नव्हती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तो मृतदेह नेमका कोणाचा असेल ? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.