दोडामार्ग : केळी बागायतींवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वार्यामुळे तब्बल 45 हजारांहून अधिक केळी जमीनदोस्त झाल्याची घटना घोटगे, परमे व वायंगणतड गावात घडली. त्यामुळे शेतकर्यांचे तब्बल 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जीवाचे रान करून उभ्या केलेल्या केळी बागायती उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकर्यांना अश्रू अनावर झाले. नुकसानीप्रमाणे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
दोडामार्ग तालुक्यात रविवारी सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. वार्यासह आलेल्या अवकाळी पावसाची सर्वात जास्त झळ घोटगे, परमे, वायंगणतड आदी गावांना बसली. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि या वादळी पावसाने हा हा म्हणता या गावांतील सर्व शेतकर्यांच्या केळी बागायती अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. यात 45 हजारांहून अधिक केळी जमीनदोस्त झाल्या. गावातील सर्व शेतकर्यांनी अहोरात्र करून उभ्या केलेल्या केळी बागायती भुईसपाट झाल्याने भरत दळवी, संदीप दळवी, विनय दळवी, नरेश काळबेकर, महेश दळवी, बाबा दळवी आदी शेतकर्यांना दुःख अनावर झाले.
शेतकरी संदीप दळवी, भरत दळवी म्हणाले, दुसरे उदरनिर्वाहाचे साधन आम्हा शेतकर्यांकउे नसल्याने आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे तिलारी पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे आमच्या बागायती पाण्याविना कोरड्या पडल्या आणि आता त्यात हे अस्मानी संकट आले आणि आमच्या तोंडचा घास हिरावून नेला. याच्यापेक्षा मोठं दुःख आम्हाला नाही असे म्हणत त्यांना रडू कोसळले.
नुकसानी प्रमाणे पंचनामे करा
आमच्या केळी बागायती अक्षरशः नष्ट झाल्या आहेत. आमच्या शेतकर्यांनी दुसर्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेऊन शेती केल्या. केळी बागायती पण शेतकर्यांनी करारावर जमिनी घेऊन केल्या होत्या. संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या केळीची नुकसानी महसूल विभागाने शेतकरी दाखवेल त्याप्रमाणे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी. सात बारा प्रमाणे जर पंचनामे केले, तर करारावर जमिनी घेऊन केळी बागायती केलेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे यात करारावर जमिनी घेऊन बागायती केलेल्या शेतकर्यांवर अन्याय होणार. म्हणून त्या शेतकर्यांचे झालेले नुकसान पाहून पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली.
अन्यथा चक्का जाम आंदोलन करणार!
ढगांच्या गडगडाटामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी मोबाईल, दूरध्वनी सेवा खंडित झाली. त्यामुळे नेटवर्क नसल्याने कोणालाही संपर्क करता आला नाही. सोमवारी येथील महसूल विभागाने घोटगे गावात नुकसानीची पाहणी करून तात्काळ आमच्या मागणी नुसार पंचनामे करावेत आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्यास येत्या आठ दिवसात कोणालाही पूर्व कल्पना किंवा निवेदन न देता समस्त घोटगे गाव रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन छेडेल आणि यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल विभाग जबाबदार राहणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांनी ही मागणी मान्य करून नुकसान भरपाई द्यावी व शेतकर्यांना न्याय द्यावा, असे घोटगे सरपंच भक्ती दळवी म्हणाल्या.