मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई एटीएसने (Anti-Terrorism Squad) बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथे छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी कोण?
मंगेश अच्युतराव वायाळ (35 वर्षे) – ट्रक चालक
अभय गजानन शिंगणे (22 वर्षे) – मोबाईल शॉपी चालक
या दोघांनी अभय शिंगणेच्या मोबाईल शॉपीतून धमकीचा ई-मेल पाठवल्याचे उघड झाले आहे. दोघेही दारूच्या व्यसनाधीन असल्याचे समोर आले असून, त्यांचे नाते आते-मामे भावाचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुंबई एटीएसची जलद कारवाई
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू करताच आरोपींचा मागोवा घेतला. अखेर बुलढाण्यातील देऊळगावमही येथे छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली. दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईला आणण्यात येत आहे.
पुढील तपास सुरू
या धमकीमागील नेमके कारण काय होते? कोणी तरी यामागे आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जाणार, याबाबत अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या असून, पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.