सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत .यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केल्या असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी सांगितले आहे.
पाणी शुद्धीकरण व ओटी टेस्टद्वारे हॉटेल व कोल्ड्रिंक मधील पाणी नमुने तपासणी :-
मागील पंधरा दिवसापासून आरोग्य विभागाद्वारे आंगणेवाडी मधील पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच सर्व स्त्रोतांची पाणी नमुने तपासणी करून घेण्यात आलेले आहेत. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धीकरण करण्याची खबरदारी घेण्यात येत असून यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या हॉटेल्स, कोल्ड्रिंक्समध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके भेट देवून ओटी टेस्ट द्वारे पाणी नमुने तपासणी करत आहे .भाविकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून वरील उपाययोजना करण्यात येत आहेत.
वैद्यकीय मदत कक्ष व विशेषतज्ञ डॉक्टरांची रुग्ण तपासणी पथके:-
यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरवता याव्यात या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. विशेष तज्ञ डॉक्टरांची एकूण 300 पथके तयार करण्यात आलेली असून सदरील पथके यात्रा कालावधीमध्ये 24 तास कार्यरत असणार आहेत. या पथकांमध्ये 13 तज्ञ डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाकडील 35 डॉक्टर अशा प्रकारे एकूण 48 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके देखील नियुक्त करण्यात आलेली असून सदरील पथके देखील 24 तास रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
108 ॲम्बुलन्स सेवा:–
यात्रेदरम्यान अत्यावश्यक वेळी ॲम्बुलन्सची आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्स त्वरित उपलब्ध होण्याकरिता 108 ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान दि. 22 व दिनांक 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये एकूण चार 108 ॲम्बुलन्स 24 तास यात्रा स्थळी उपलब्ध राहणार असून याकरिता ॲम्बुलन्स सोबत डॉक्टर, स्टाफ व ड्रायव्हर यांचे नियोजन करण्यात आलेले आहे व त्या पध्दतीने याबाबतचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आलेले आहे.
क्षारसंजीवनी:- उपस्थित भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून मुबलक प्रमाणामध्ये क्षार संजिवनीची उपलब्धता आरोग्य पथकांकडे करण्यात आलेली आहे.
Emergency Exit:-
यात्रेच्या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी संदर्भित करावयाचे झाल्यास Emergency Exit चा वापर करुन सदरील रुग्णांना तातडीने संदर्भसेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे आरोग्य विभागाने यात्रेच्या दरम्यान भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी उपाययोजना केलेल्या असून यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्य विषयक अडचणी उद्भवल्यास वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.