जत्रेच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांचा आढावा
मालवण : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारीला होत आहे. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आंगणेवाडी येथे भेट देत विविध प्रशासकीय विभागांच्या जत्रा पूर्व नियोजनाचा आढावा घेतला. आंगणेवाडी मध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. आंगणे कुटुंबियांच्या सहकार्यातून जत्रोत्सव यशस्वीरित्या संपन्न करूया असे यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, प्रांत ऐश्वर्या काळुशे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी घनशाम आढाव, तहसीलदार वर्षा झालटे, मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे आदी उपस्थित होते.
भाविकांना तसेच व्यवसाईकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाकडून पाच पाण्याचे टँकर मिळावेत अशी बाबू आंगणे यांनी मागणी केली. देवालय व जत्रा परिसरात ३५ सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रोहन व्हिडिओचे अनंत आंगणे यांनी दिली. खराब वीज पोल तातडीने बदलावेत याबाबत वीज वितरण विभागाला सूचना केल्या. आग प्रतिबंधक यंत्रणा प्रत्येक व्यवसाईकाने आपल्या दुकानात ठेवावी. रस्त्यावर व्यापाऱ्यांना बसायला परवानगी देऊ नये आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. आरोग्य विभागाकडून दोन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून ५ रुग्णवाहीका तैनात असणार आहेत अशी माहिती देण्यात आली. गर्दी मध्ये लवकर पोचण्यासाठी २ टीम तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या. बीएसएनएल कडून आणखी एक हंगामी टॉवर उभारण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. खासगी कंपनीचा गतवर्षी प्रमाणे हंगामी टॉवर उभारावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसटी विभागाच्या वतीने १२० यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. देवगड आंगणेवाडी मालवण ही बसफेरी अनियमित असल्याबाबत बाळा आंगणे यांनी नाराजी व्यक्त केली. पाच अग्निशमक गाड्या, १० मोबाइल टॉयलेट नगरपालिका पुरवणार असल्याची माहिती दिली. जत्रेच्या दिवशी रात्री ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर देवालय बाजूचा रस्ता तसेच खालील भागात जादा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी बाळा आंगणे यांनी केली.
यावेळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, आरोग्य विभागाचे डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संजय पोळ, एसटीच्या गौतमी काळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील, स्नेहा लोखंडे, ग्रामपंचायत प्रशासक एस. डी. चव्हाण, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संतोष सावर्डेकर, प्रकाश कात्रे, गौरव गावित, साईनाथ चव्हाण, राजश्री सामंत, मंडळ अधिकारी श्रीमती एम. एस. चव्हाण, तलाठी रवी तारी, पोलीस प्रमोद नाईक, विवेक फरांदे, कैलास ढोले, पोलीस पाटील पंकज आंगणे, मंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, मधु आंगणे तसेच विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते. बाळा आंगणे यांनी आभार मानले.