सावंतवाडी : गुरांना चारायला शेतात गेलेले असताना जंगलातून आलेल्या गवळ्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात नेमळे धारकरवाडी येथील सोनू मधुकर राऊळ ( वय ३७) हा युवक गंभीर जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थानी त्याला त्वरित उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सोनू राऊळ हा आपली गुरे घेऊन नेमळे धारकरवाडी येथील आपल्या शेतात गुरे चारित होता. त्याचवेळी जंगलाच्या दिशेने रानगव्यांचा भला मोठा कळप त्याच्या दिशेने धावत आला. या नव्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर रित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला छातीला व पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला त्वरित उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामी सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांनी मदत कार्य केले.
दरम्यान रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची माहिती मिळतात सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, विजय पांचाळ, वनरक्षक सुनील गडदे यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीची विचारपूस केली तसेच नातेवाईकांना धीर दिला.
सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात अशा घटना वारंवार होत असून वनविभागाने रानगव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच रानगव्यांच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनू राऊळ या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.