सावंतवाडी ( प्रतिनिधी ) : येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे संचालक रुजूल पाटणकर व विद्यार्थी पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व प्रगतीपत्रक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी सहावितील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निधी सावंत यांनी केले तर शिक्षिका ग्रिष्मा सावंत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता दिली.