कणकवली | शिरगाव : चाफेड येथील सरपंच किरण लीलाधर मेस्त्री ( वय ४०, रा. चाफेड पिंपळवाडी ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री यांनी आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना बुधवारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. ते चाफेड गावचे सरपंच म्हणून २०२२ पासून कार्यरत होते. किरण मेस्त्री यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, भाऊजय, एक बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.
किरण मेस्त्री यांना मूर्तिकलेची आवड होती. उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मूर्तिकलेबरोबर ते मेस्त्रीकाम आणि शेती व्यवसाय देखील करत असत. दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत चाफेड दुर्गाचा डोंगर या गडाच्या संशोधनासाठी व साफसफाईसाठी त्यांनी पुढाकार देखील घेतला होता. त्याचप्रमाणे त्यांना गोवा सरकार पी डब्लू स्टाफ को. ऑप. केडिट सोसायटीच्यावतीने इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेलगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे मे महिन्यात त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाफेड गावावर शोककळा पसरली आहे.