पोलीस प्रशासन अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचाही केला आरोप
देवगड : चार-पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पालक मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. सदर बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात सुरू असलेले अवैध दारूचे अड्डे आणि दारू विक्री, मटका जुगार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कठोर कारवाई करणे तसेच हा जिल्हा ड्रग्स मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणे आपली ताकद वापरावी असे आदेश दिले होते.
परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनास कडक स्वरूपात आदेश देऊनही काही दिवस उलटले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. किंबहुना पोलीस प्रशासनाने पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला गंभीरतेने घेतलेले ही दिसत नाही. त्या उलट पोलीस प्रशासन असे अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालताना दिसत आहेत. प्रशासनाच्याच आशीर्वादाने हे सर्व अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे अशा प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनसे विद्यार्थी सेना उप जिल्हाध्यक्ष राकेश मिराशी यांनी व्यक्त केल्या आहेत.