0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

बदलापूर पुन्हा हादरलं, ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं शेजारच्या दादाने…

बदलापूर : बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापुरात पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एरंजाड गावात ६ वर्षीय चिमुकलीसोबत हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात १४ जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने कडेवर घेत बसस्टॉप शेजारील निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे तिच्याशी अश्लील चाळे केले. यावेळी मुलगी रडू लागल्याने त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं.

दुसऱ्या दिवशी मुलगी अतिशय घाबरलेली होती. चिमुकली शाळेत जायला तयार नसल्यानं तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन प्रश्न विचारले. त्यावेळी तिने शेजारच्या दादाने काल काय केलं, ते तिने सांगितलं. यानंतर मुलीच्या आईने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकाराबाबत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं.

त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, मागील वर्षी बदलापुरातील शाळेत चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संतापजनक घटनेने संपूर्ण बदलापुरासह राज्यातून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. शाळेतच काम करणाऱ्या अक्षय शिंदेने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला जात असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!