‘बँकेतून बोलतो’ असे सांगत बँकेचे घेतले सर्व डिटेल्स
कणकवली : कॅनरा बँकेतून बोलतो असे सांगत पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली.तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८ रुपये लंपास करण्याची घटना घडली आहे.या फसवणूक प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.५२ वाजण्याच्या सुमारास घडली.
कणकवली येथील रेल्वे वरिष्ठ अभियंता विभागात प्रकाश पांडुरंग गुजरी(रा.शिवशक्तीनगर, कणकवली) हे कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने आपण कॅनरा बँकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.तसेच त्यांचे पॅनकार्ड अपडेट करावे लागेल असे सांगत कॅनरा केवायसी अँप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठवली.तसेच त्यावर बँक डिटेल्स व इतर माहिती जाणून घेतली.काहीवेळाने प्रकाश गुजरी यांना त्यांच्या पणजी येथे असलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यावरील १लाख ४९हजार ५६८ रुपये गायब झाल्याचे लक्षात आले.आपली फसवणूक झाल्याचे समजताच प्रकाश गुजरी यांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.