भीती दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून प्रदर्शन
उपस्थितांना लाभले अप्पर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मार्गदर्शन
मयुर ठाकूर ( कणकवली ) : आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरही लोकांच्या मनात पोलिसांबद्दल ब्रिटिश काळात जसा धाक होता तसाच आहे. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. भीती दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एका दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता ‘रेझिंग डे’ सप्ताह सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी दिली.
पोलिस दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात सिंधुदुर्ग पोलिस दलाच्यावतीने तीन दिवसीय “रेझिंग डे” प्रदर्शन आयोजित करण्यात ले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी येथील बस स्थानकासमोर उड्डाणपुलाखाली अप्पर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा पोलिस गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, राजेंद्र गाडेकर, प्रदीप चव्हाण, विनोद चव्हाण, किरण मेथे, राज आघाव यांच्यासह पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील, रिक्षाचालक, विद्यामंदिर हायस्कुलचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली येथे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनातून सायबर पोलिस ठाणे, पोलिस ठाणे कामकाज, डायल ११२, भरोसा (महिला) सेल, फॉरेन्सिक युनिट, शस्त्रांची माहिती, जिल्हा वाहतूक शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, सागरी सुरक्षा, बिनतारी संदेश अशा विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शन लावण्यात आले होते. कणकवली शहरातील तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी पोलिस दलाच्या वतीने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनास भेट देऊन त्यांच्या विविध विभागांची व शस्त्रांची माहिती घेतली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केले. तर कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.