कणकवली : तालुक्यातील देवगड निपाणी राज्य मार्गालगत कोळोशी वरची वाडी येथे दोन महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सध्या गावी आलेले सहा. पो. उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये खुनाचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी संशयित म्हणून सिद्धिविनायक पेडणेकर ( वय – २४ ) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर घटनेची कबुली देखील दिली. यावेळी सिद्धिविनायक पेडणेकर याला कणकवली पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेत मयत झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सहा. पो. उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर यांचे नातेवाईक मुंबईहून कणकवली कोळोशी येथे शुक्रवारी दाखल झाले. यावेळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, चुलते असा परिवार आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस पुढील तपास करत आहेत.