कणकवली : कणकवली मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ४२ टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी सहा पर्यंत ७० ते ७५ टक्के पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. यात चाकरमान्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास मंगलोर एक्सप्रेसमधून हजारो चाकरमानी घोषणा देत कणकवली रेल्वे स्थानकात उतरले. त्यानंतर आलेली कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस अाणि जनशताब्दी एक्सप्रेसमधूनही हजारो चाकरमानी कणकवली मतदारसंघात दाखल झाले. या सर्वांनी दुपारपर्यंत मतदानाचे कर्तव्य बजावले असून चाकरमान्यांची ही मते विजयी उमेदवाराच्या मताधिक्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत.
कणकवली शहर आणि शहरालगत असलेल्या गावांच्या बूथवर सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे नऊ नंतर मतदारांची मोठी गर्दी झाली. तर दुपारी तीन नंतर देखील मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. कणकवली मतदारसंघात महायुतीचे नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत आहे. तर अपक्ष उमेदवार नवाज खानी हे किती मते घेतात याकडेही राजकीय कार्यकर्ते आणि जनतेचे विशेष लक्ष आहे. आमदार नितेश राणे यांना ५० हजाराचे मताधिक्य मिळावे यादृष्टीने मतदानाचा टक्का वाढवा यासाठी भाजप कार्यकर्ते राबताना दिसून आले. तर महाविकास आघाडीचे बूथही मतदान केंद्राबाहेर लागले होते.