सिंधुदुर्ग (जिमाका वृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉइंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एंट्री पॉईन्टवर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील इन्सुली बांदा येथील पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चेक पोस्ट, सातार्डा चेकपोस्ट, आरोंदा चेक पोस्ट, कुडाळ तिठा मठ चेकपोस्टला मध्यरात्री अचानक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी भेटी दिल्या आणि पथक करत असलेल्या कार्यवाहीची पाहणी केली. तसेच स्थिर पथकाने आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, विशेषत: सिमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.