एस.टी.आगार प्रमुखांना विचारला जाब : तातडीने भरपाई देण्याची मागणी
कणकवली : बसस्थानकात उंबर्डे येथील फातिमा बोथरे या महिलेचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समजताच अल्पसंख्याक नेते आणि कणकवली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तातडीने कणकवली बसस्थानकात धाव घेतली. यावेळी तेथील आगार प्रमुख प्रमोद यादव यांना त्यांनी घेराओ घातला. तसेच त्या महिलेच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. कणकवली बसस्थानकात दोन एस.टी. चालकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उंबर्डेतील फातिमा बोथरे यांचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच अल्पसंख्याक नेते नवाज खानी हे सर्व प्रथम आपल्या कार्यकर्त्यांसह बसस्थानकात पोचले. त्यांनी आगारप्रमुख प्रमोद यादव यांना या घटनेबाबत जाब विचारला तसेच नवाज खानी यांच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात आंदोलन करून सर्व बस रोखून धरल्या. दरम्यान नवाज खानी यांच्यासह आक्रमक झालेल्या सादिक धोपावुकर, साहील चौगुले, सादिक खतीब, रोहित पठाडे आदी कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख प्रमोद यादव यांना घेराओ घालून मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीने पाच लाख रूपयांच मदत द्यावी अशी मागणी केली. मात्र आगार प्रमुख श्री.यादव हे तातडीने पाच हजार रूपयांची मदत देता येत असल्याचे सांगत होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या श्री.खानी यांनी पाच लाख रूपयांची मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान श्री.खानी यांनी आगारप्रमुख यांच्या केबिनमध्ये आंदोलन सुरू केल्यानंतर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली होती. आंदोलनावेळी मृत महिलेच्या कुटुंबियांना भरपाईबाबत चर्चा सुरूच राहिल. तोपर्यंत एस.टी. वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र श्री.खानी यांनी त्याला साफ नकार दिला. जोपर्यंत एस.टी.चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियांना भरपाई देण्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नवाज खानी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला. दुपारी दोनच्या सुमारास एस.टी.चे विभाग नियंत्रक श्री.देशमुख यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाच लाख रूपये मदत देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.