सावंतवाडी | प्रतिनिधी : शहरातील माठेवाडा परिसरातील एका युवकाची ॲप कंपनीने तब्बल अकरा लाख एकावन्न हजारांची फसवणूक केली आहे. दिग्विजय अशोक मुरगोड ( वय ३०, रा. माठेवाडा ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित ॲप बनवणाऱ्या कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की हॉटेलसाठी बुकिंग करणाऱ्या एका ॲप कंपनीने सावंतवाडी शहरातील एकाची साडे अकरा लाख रुपयांना फसवणूक केली. हा प्रकार गेल्या महिन्या पासून सुरु आहे.
यातील फिर्यादी दिग्विजय मुरगोड हे इफको टोकीयो इन्शुरन्स कंपनीचे सिंधुदुर्ग जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांना कंपनीने हॉटेल बुकिंग करण्याचा टास्क दिला होता तो टास्क पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देखील देण्यात आले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी हा टास्क पूर्ण करण्याकरिता एप वर जाऊन हॉटेल बुकिंग करण्यास सुरुवात केली त्यानंतर एप कंपनीने त्यांना पैसे पाठवण्यास सांगून त्यांच्याकडून वारंवार बॅलेन्स कमी असल्याचे सांगून दीड लाख, दोन लाख असे करीत एकूण साडे अकरा लाख रुपये आरटीजिएस द्वारे आपल्या खात्यात मागून घेतले. त्यानंतर त्या कंपनीमधून कोणताही प्रतिसाद आला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. हा प्रकार ३० मार्च ते ९ एप्रिलच्या दरम्यान घडला. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली त्यावरून संबंधित हॉटेल बुकिंग करणाऱ्या कंपनी व्यवस्थापन विरोधात पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपाससुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांनी दिली.