मयुर ठाकूर | कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील उबाटा शिवसेना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उबाा शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १३ नोव्हेंबरला तिन्ही मतदारसंघामध्ये सभा होणार आहेत. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उबाटा शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर दुपारी २.३० वा. सभा होणार आहे. सभेची उबाटा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सभेसाठी उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. भर दुपारी सभा असल्याने भव्य सभामंडपाचीही उभारणी करण्यात येत होती. रात्रीच्या सुमारास सभा परिसरात भगवे झेंडेही लावण्यात येत होते. सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सभेला उद्धव ठाकरे यांच्यासमवेत माजी खासदार तथा पक्षाचे सचिव विनायक राऊत, उपनेते शरद कोळी यांच्यासह राज्यभरातील महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सभेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केले आहे.