शासकीय मेडिकल बंद पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा घा
मालवण : जिल्ह्याच्या राजकारणावर ३५ वर्षे एकहाती सत्ता असणाऱ्या नारायण राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील अनेक खात्यांची मंत्रीपदे, मुख्यमंत्री पद भुषविले होते तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते असे असताना सिंधुदुर्गाच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अगर शासकीय मेडिकल कॉलेज साकारण्यासाठी त्यांनी कोणताही प्रयत्न केला नाही. उलट आपले स्वतःचे मेडिकल कॉलेज करण्यास त्यांनी रस दाखविला होता. या उलट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेज निर्माण करून त्याचा फायदा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना होण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. यामुळे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गातील आरोग्य प्रश्न आणि जिल्हा मेडिकल कॉलेजसंदर्भात भाष्य करणे म्हणजे हास्यास्पद आहे, अशी टिका उबाठाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली.
यावेळी माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नितीन वाळके, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, उमेश मांजरेकर, निनाक्षि शिंदे, दिपा शिंदे, सोनाली डिचवलकर, प्रसाद चव्हाण, रूपा कुडाळकर, नरेश हुले, मधु लुडबे, संदेश कोयंडे, शशीकांत यादव, सदा लुडबे, तेजस लुडबे, राहुल जाधव, उमेश चव्हाण, सुरेश मडये तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचे षडयंत्र काही मंडळींना हाताशी धरून खेळले जात आहे. त्याठिकाणी शासनाने मंजूर केलेली अनेक मशिनरी त्याठिकाणी कार्यरत होवू नये याची काळजी महायुतीच्या शासन काळात घेण्यात आली आहे. यामुळे आजही रूग्णांना कोल्हापूर किंवा गोवा याठिकाणी जावे लागत आहे. गेल्या अडीच वर्षात मेडिकल कॉलेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ते बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप श्री. केणी यांनी केला.
आपल्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलच्या गोष्टी राणे करत आहेत, मात्र त्याठिकाणी गेलेल्या रूग्णांना मोफत उपचार करण्यात आले काय? त्याठिकाणी गेलेल्या रूग्णांकडून घेण्यात आलेल्या उपचाराच्या फी बद्दल अनेक चर्चा यापुर्वी रंगल्या आहेत. यामुळे राणेंनी आपल्या हॉस्पीटलमध्ये किती जणांना मोफत उपचार केले तेही जाहीर करावे, असाही इशारा श्री. केणी यांनी दिला. जनतेला मोफत उपचार होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रयत्न करून मेडिकल कॉलेज सुरू केले होते, असेही श्री. केणी यांनी सांगितले.
छत्रपतींचा पुतळा मालवणमध्ये कोसळला त्यावेळी वैभव नाईक काही क्षणात घटनास्थळी पोहचले होते, यावरून राजकारण करणाऱ्या निलेश राणे यांनी त्यावेळी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या, चार दिवसात यातील षडयंत्र बाहेर काढणार असल्याचेही सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत षडयंत्र बाहेर आले नाही, यामुळे त्यांचे बोलणेच म्हणजे एक षडयंत्र होते काय? याचे उत्तर राणे देणार कधी? असा प्रश्न श्री. केणी यांनी उपस्थित केला. मालवण बसस्थानकातील स्वच्छतागृहांवर भाष्य करताना महायुतीच्या काळात मोठा गाजावाजा करून रेल्वे स्थानकांची करण्यात आलेली दुरूस्ती आणि सुशोभिकरण करताना त्यामधील सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे, तेही नारायण राणेंनी कधीतरी पहावे. फक्त बाहेरून सजावट केली म्हणजे जनतेला सुविधा मिळाल्या असे होत नाही. प्लॅटफॉमवर बसण्यासाठी सुविधा नाही, स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. यामुळे फक्त नाईक यांच्यावर टिका करताना आपल्या महायुतीच्या काळातीलही कामांवर भाष्य करावे, असाही टोला श्री. केणी यांनी लगावला. लवकरच सर्व सुशोभिकरण कामातील गोष्टी आणि स्वच्छतागृहे यांचे फोटो जनतेसाठी दाखविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी साम दाम भेद दंड याचा वापर विरोधकांकडून केला जात आहे.
जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते पक्ष सोडून ठाकरे सेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे निलेश राणे यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी जावून त्यांच्यावर जबरदस्ती केली जात आहे. मात्र जे मनातून दुखावलेले आहेत, ते कधीही राणेंची साथ करणार नाहीत. सध्या व्यावसायिकांनाही त्रास देण्याचे काम सुरू आहे. वाळू व्यावसायिकांनाही कारवाईच्या धमक्या दाखविण्यात येत आहेत. वाळू व्यावसायिकांनी धमक्यांना घाबरण्याचे कारण नाही, असेही केणी म्हणाले. तर बँकांच्या कर्जदारांना कारवाई टाळण्याचे गाजर दाखविण्यात येत आहे. यामुळे बँकेच्या पतवर होत असलेल्या परिणामांचाही संबंधितांनी विचार करायला हवा, असाही टोला श्री. केणी यांनी लगावला. ठेकेदारीवर राणे बोलत असताना त्यांच्या आजुबाजुला असणाऱ्या व्यक्तींचाही हिशोब घ्यावा. त्यांचे जवळचे असणारे दत्ता सामंत यांनी केलेली कामे जनता विसरलेली नाहीत. चिंदर, महान, कट्टा, आनंदव्हाळ येथील रस्त्यांची काही महिन्यातच झालेली दुर्दक्षा यातून जनतेने आपला निर्णय केला आहे. यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करताना याही कामांचा हिशोब करायला हवा. पर्ससीनधारकांची बाजू घेवून पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्याचे पापही राणेंनी केले आहे. यामुळे किनारपट्टी भागातून राणेंना कधीच मतदान होणार नाही. मच्छीमारांच्या पाठिशी आमदार वैभव नाईक हे कायम राहिलेले आहेत, राणेंनी पर्ससीन बोटींना पकडण्यासाठी आणलेली बोट काही दिवसांतच गायब करण्यात आली होती, याचीही माहिती निलेश राणेंनी घ्यावी, असाही टोला श्री. केणी यांनी लगावला आहे. वैभव नाईक यांनी कोरोना काळात सर्व शासकीय हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन युनीट सुरू केली. अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करून सर्वसामान्यांना आधार दिला होता. मात्र त्यावेळी अनेकांनी आपला फायदा पाहिला होता, अनेक रूग्णांना याचा वाईट अनुभव आला आहे. वैभव नाईक यांनी जिल्हा रूग्णालयात निर्माण केलेले ऑक्सीजन सेंटर यातून अनेकांचे जीव वाचले आहेत, यामुळे कोविड काळातील आमदारांची कामगिरी ही सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर आहे. निवडणुकीतपुरते जनतेत मिसळणाऱ्यांना जनता जागा दाखवून देणार आहे, असेही श्री. केणी यांनी स्पष्ट केले.