वर्ष होऊनही मंगळसूत्र परत न केल्याने पोलिसात तक्रार ; गुन्हा दाखलः कलमठ येथील प्रकार
कणकवली : नातेवाईकाच्या लग्नाच्या दोन दिवसासाठी वापरण्यास घेतलेले मैत्रिणीचे मंगळसूत्र परस्पर गहाण ठेऊन फायनान्स कंपनीकडुन १ लाख रूपयाचे कर्ज घेतले. हा प्रकार उघड होताच, काही दिवसातच मंगळसूत्र परत करण्याची हमी देऊनही आता १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला तरी अद्यापही परत न केल्याने सौ. मयुरी नितीन मेस्त्री (३४, रा. आशिये नाडकर्णीनगर हिने निरधा उर्फ शामल निलेश कदम (रा. कलमठ- बौद्धवाडी) हिच्याविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भादवि ४२० अन्वये शामल कदम हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कलमठ गावात ‘ग्रामीण कोटा’ कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीने कर्ज देण्यासाठी दोन गट बनविले आहेत. या दोन्ही महिला वेगवेगळ्या गटात आहेत. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता निरधा उर्फ शामल कदम हिने तिच्या मोबाईलवरून सौ. मयुरी नितीन मेस्त्री हिच्या मोबाईलवर कॉल करून तिला आशिये-पुर्णानगर येथे येण्यास सांगितले. आशिये-पुर्णानगर येथे तिची मैत्रिण निरधा उर्फ शामल तिची भेट झाली. यावेळी निरधा हिने मयुरीला सांगितले आपण दोन दिवसासाठी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईला जात आहे. मला दोन दिवसांसाठी तुझे मंगळसूत्र मला दे, असे सांगितले. दोन वर्षापूर्वीपासून ओळख झालेल्या मैत्रिणीचा विश्वास असल्याने मयुरीने तिला सहज मंगळसूत्र दिले. मैत्रिण विश्वासाची असल्याने तीन तोळ्याचे मंगळसूत्र तिला देऊन मयुरी हिने सदरबाबत कोणतेही लेखी स्वरूपात कागदपत्र केली नाही.
चार दिवसानंतर मयुरी मेस्त्री व तिची जाऊ धनश्री मेस्त्री ह्या दोघेजण निरधा निलेश कदम हिच्या बौद्धवाडी येथे घरी गेले. तेव्हा तिने आपल्याला पैशाची गरज भासल्याने तुझे मंगळसूत्र मी गहाण ठेऊन १ लाख रूपयाचे कर्ज घेतल्याचे सांगितले. काही दिवसातच तुझे मंगळसूत्र सोडवून परत देतो. परंतु अद्यापही मंगळसूत्र परत केले नाही. विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.