24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कुडाळमध्ये व्हिडिओ गेम जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी ; आठ जणांच्या आवळल्या मुसक्या

कुडाळ : कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली व्हिडिओ गेमला जुगाराचा अड्डा बनविणाऱ्या पाच व्हिडिओ गेमपार्लरवर कुडाळ पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. यामध्ये ४६ इलेक्ट्रिक मशीनसह एकूण ९ लाख ६३ हजार ५५० रू. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी शनिवारी रात्री ७.२० ते रात्री ११.५० या कालावधीत केली आहे. कुडाळ शहरातील गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच अशी मोठी कारवाई असून यामुळे जुगार व्यावसायिकांसह अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलि लसांनी कुडाळ शहरातील विविध ठिकाणच्या व्हिडिओ गेमवर छापा टाकला. यामध्ये कुडाळ एसटी स्टँडचे समोर असलेल्या ओमसाई राम व्हिडिओ गेम , पुष्पा हॉटेलईच्या बाजूला असलेल्या साईदर्शन व्हिडिओ गेम, आंबेडकर पुतळ्याजवळ कुडाळेश्वर व्हिडिओ गेम, आंबेडकर पुतळ्याजवळ म्युझिक व्हिडिओ गेम व नक्षत्र टॉवर येथील मुजीब व्हिडिओ गेम या नावाच्या व्हिडिओ गेमवर छापा टाकला.यावेळी काही जण या व्हिडिओ गेममध्ये जुगार खेळत असताना आढळून आले तर काही जण स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा ठेवून त्या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे लोकांकडून पैसे स्वीकारून जुगाराचा खेळ खेळवत असताना मिळून आले. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण जयराम माळवे (वय ३८ वर्षे, रा. कुडाळकर चाळ केळबाई मंदिर जवळ, ता. कुडाळ), महादेव रतन निषाद (वय ३३ वर्षे, राहणार रेल्वेस्टेशन रोड कुडाळ), भीमराय ऐबत्ती परगणी (वय ४४ वर्षे, रा. आंबेडकरनगर
कुडाळ), संजय महादेव वाडकर (वय ५२ वर्षे, रा. सबनीसवाडा सावंतवाडी, ता. सावंतवाडी) रफिक कादरसाब अगडी (वय ४६ वर्षे रा.निवारा आर्केड, पिंगुळी म्हापसेकर तिठा, वैभव यशवंत सरमळकर (वय २७ वर्षे, रा. सरंबळ कदमवाडी कुडाळ, शैलेशकुमार धरमसेन गुप्ता (वय ३९ वर्षे रा. सालईवाडा सावंतवाडी), अक्षय अनिल धारगळकर (२९ वर्षे, रा. कुडाळ, मधली कुंभारवाडी,) कुडाळ) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ९ लाख २० हजार रू. किमतीचे एकूण ४६ आयताकृती आकाराच्या इलेक्ट्रिक जुगार खेळण्याच्या मशीन, संशयित आरोपीत यांच्या अंगझडतीत मिळून आलेली रोख रक्कम ४३ हजार ५५० रू. असा एकूण ९ लाख ६३ हजार ५५० रू. चा मुद्देमाल पोलिसांनी पंचनामा करत जप्त केला आहे. घटनास्थळी भेट कुडाळ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भांड यांनी भेट दिली. यावेळी कारवाईत पोलीस संजय कदम, कृष्णा परूळेकर, सचिन गवस, गणेश चव्हाण यांनी सहभाग घेतला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश मारुती मांजरेकर यांनी कुडाळ पोलिसात दिली अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. याबाबत शिंदे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक, सिधुदुर्ग यांना १८ मार्च २०२४ रोजी निवेदन देऊन याकडे लक्ष वेधत सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व व्हिडिओ गेमपार्लरमध्ये जुगार चालविला जात असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतची मागणी केली होती.

व्हिडिओ गेमपार्लरसाठी महाराष्ट्र शासन राजपत्रच्या नियमावलीच्या आधारे परवाना दिला जातो. परंतु, या राजपत्रात दिलेल्या अटी व शर्ती यांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून सध्या संपूर्ण जिल्हाभरात अनधिकृत व्हिडिओ गेमपार्लर चालू असून त्यात करमणुकीच्या नावाखाली जुगार चालविला जात आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिक झटपट श्रीमंत होण्याकडे आकर्षित होऊन अशा गेमपार्लरकडे जात आहेत. तेथे गेल्यावर करमणुकीच्या नावे चालू असलेल्या गेम पार्लरमध्ये राजरोस आर्थिक फसवणूक केली जात आहे. यावर संपूर्ण जिल्हयातील सर्व गेमपार्लरची तपासणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः करून काय‌द्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा गेम पार्लर चालकांवर व तेथील कामगारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील होत आहेत. लोक कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या देखील करत आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करून गावातील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा संघटक रूपेश पावसकर यांच्यामार्फत करण्यात आली होती. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!