7.7 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

कणकवली, सावंतवाडीतील आमदार बदलण्यासाठी शिवसैनिकांनी सज्‍ज व्हावे

ठाकरे शिवसेना नेत्यांचे आवाहन ; तेली-उपरकर यांचे कणकवलीत जोरदार स्वागत

कणकवली : कणकवली, सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांनी “बदल नवा… आमदार नवा..” हे स्लोगन घेऊनच घराघरात पोहोचावे. कणकवली, कुडाळमधून आता जर राणे बंधूंना निवडून देण्याची चूक केलात तर पुढील काळात नारायण राणेंचे नातू आमदार, खासदार होऊन तुमच्यावर राज्‍य करतील आणि सिंधुदुर्ग जिल्‍हा राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होईल.

त्‍यामुळे राणे कुटुंबियांना घरी बसविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्‍ज व्हावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली, परशूराम उपरकर यांच्यासह विधानसभा संघटक सतीश सांवत, शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज केले.

माजी आमदार परशूराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर कणकवली विधानसभा शिवसेनेच्या वतीने या नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कणकवलीत भव्य सत्कार करण्यात आला. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी हा सत्कार झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सरपंच बंडू ठाकूर, राजू राठोड, माजी सभापती आबू पटेल, मिलिंद साटम, प्रसाद करदिकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, जयेश नर, यांच्यासह अन्य शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी भाषण करत असताना माजी आमदार राजन तेली यांनी आपापसात भांडू नका एकत्र व्हा व इच्छुकानी एकत्र येऊन लढा असे सांगितले. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एकत्र येऊन काम करा प्रसंगी मारा, झोडा मी तुमच्या सोबत आहे. अशी आक्रमक भूमिका घेत १९९० मधील शिवसैनिकांची भूमिका बोलून दाखवली. अनेक पदाधिकाऱ्यांकडून उपरकर व राजन तेली यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यानंतर सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी भगवती हॉलमधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत येत छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व घोषणाबाजी देखील केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सावंत यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!