सावंतवाडी पोलिसांची कारवाई; सफारी कारसह ५० हजाराचा मुद्देमाल जप्त…
सावंतवाडी : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश मधील दोघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५० हजारांच्या दारूसह बारा लाखाची सफारी कार जप्त करण्यात आली आहे. राकेश पोलु पोईना ( वय २३ ), मुहम्मद अन्वर बेग ( वय ३८ ) दोघे ( रा. विजयवाडा-आंध्रप्रदेश ) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई आज पाच वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. या नाकाबंदी दरम्यान आंध्र प्रदेश येथे जाणारी सफारी कार पोलिसांकडून तपासण्यात आली. यावेळी या गाडीत तब्बल पन्नास हजार रुपयांची दारू आढळून आली आहे. त्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता देसाई, मनीष शिंदे, राजेश नाईक यांच्या पथकाकडून करण्यात आली. याप्रकरणी संबंधित दोघा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.