सिंधुदुर्ग ( मयुर ठाकूर ) : विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वादाला आता तोंड फुटणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख, माजी आमदार राजन तेली भाजपला राम राम करणार आहेत. ते आपल्या विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत. आज शुक्रवारी सकाळी ते आपला पक्षप्रमुख पदाचा व भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजतेय. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाड होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.
श्री. तेली यांनी काही दिवसापूर्वीच मी काही झालं तरी निवडणूक लढवणारच अशी गर्जना केली होती. भाजपच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबाही दर्शवला होता. मात्र त्यांनी भाजपच्या वरिष्ठांना वारंवार कळवूनही कोणतीच दखल न घेतल्याने अखेर त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चाही केल्याचे समजते. श्री. तेली यांनी भाजपमध्ये थांबावे असेही त्यांना सूचना करण्यात आली आहे. परंतु, राजन तेली यांनी आपला निर्णय पक्का केला असून ते भाजपला सोडचिट्टी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते मातोश्रीशी जवळीक साधण्याच्या मनस्थितीत आहेत.. आज शुक्रवारी सायंकाळी ते मातोश्रीवर जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मानला जात असून आता केसरकर विरोधी तेली अशी विधानसभेची लढत पाहायला मिळणार आहे.