एकाच चोराच्या अटकेमुळे आणखी चार गुन्हे उघडकीस
कोल्हापूर |यश रुकडीकर : धीरज जीवन टोपणे हा युवक आपल्या घरी जाण्यासाठी दि.१२ रोजी पहाटे मध्यवर्ती बसस्थानक,कोल्हापूर येथे थांबला होता.या वेळी २ इसम त्याच्याजवळ आले व धीरज ह्याच्या हातातील विवो व्हाय १७ कंपनीचा १८,००० रुपयांचा मोबाईल हाताला हिसडा मारून चोरून घेऊन गेले.धीरज याच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा करणारा इसम दौलत नगर परिसरात राहतो.दौलत नगर येथे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता संशयित इसम हा सायबर चौकात थांबला असल्याची माहिती मिळाली.सायबर चौकामध्ये त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली.त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने आपले नाव ओंकार मल्लिकार्जुन पोवार,वय १९, रा.दौलत नगर,सायबर चौक,कोल्हापूर असे सांगितले.त्याने चोरी केलेला मोबाईल घरी असल्याचे सांगितले.संशयिताच्या घराची झडती घेताना त्याच्या घरात आणखी चार मोबाईल सापडले.त्या ४ मोबाईलबद्दल चौकशी केली असता त्याने हे मोबाईल चोरी करून घरी आणल्याचे सांगितले.त्याने चोरलेले विवो वाय १७, सॅमसंग ,सॅमसंग गॅलेक्सी A ३१, विवो व सॅमसंग असे ६८,००० रुपये किंमतीचे ५ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
सदरची कारवाई स.पो. नि.विशाल मुळे,सहाय्यक फौजदार संदिप जाधव,मिलिंद बांगर,महेश पाटील,बाबा ढाकणे,विकास चौगुले,रवी आंबेकर,सुशील गायकवाड, सनिराज पाटील,गौरव शिंदे व संदीप बेंद्रे यांनी केली.