वैभववाडी प्रतिनिधी : गरीने मासे मारायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दयानंद पांडुरंग हडशी वय २८ रा. नेर्ले कुणबीवाडी असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी १३ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.
रविवारी सकाळी दयानंद हडशी हा त्याचा मित्र राजेंद्र विशाल पाटील याच्या समवेत भुईबावडा येथे गेला होता. तेथून त्याने स्वयंपाकाच्या गॅसची टाकी घेऊन घरी आला. दुपारी घरी आल्यानंतर त्याचा मित्र राजेंद्र पाटील याच्यासोबत तो नेर्ले जामदानदी येथील रकची कोंड येथे दोघेजण गरीने मासे मारायला गेले होते. यावेळी दयानंद नदीपत्रातून आंघोळीसाठी उतरला, पाणी खोल असल्याने दयानंद याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. त्याचा मित्र पाटील याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल झाला. या घटनेची माहिती मित्र राजेंद्र याने त्यांच्या घरच्यांना दिली. तेथील ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत त्याचा शोध शोध केला मात्र तो सापडला नाही.
रविवारी सायंकाळी उशिरा वडील पांडुरंग गणपत हाडशी यांनी आपला मुलगा पाण्यात बुडाल्याची माहिती वैभववाडी पोलिसांना दिली. सोमवारी वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस हवालदार शैलेश कांबळे, श्री कोलते हे घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थ व वैभववाडी पोलिसांनी खोल नदीपत्रात शोधाशोध केली असता सोमवारी दुपारी तीन वाजता मयत दयानंद हाडशी याचा मृतदेह सापडला. घटनेचा पंचनामा करून अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शैलेश कांबळे करीत आहेत. मयत दयानंद यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ आहेत.