उबाठा सेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर : इतर कार्यकर्तेही संभ्रमात
वैभववाडी प्रतिनिधी : उबाठा युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा युवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी राजीनामा दिल्यामुळे तर्कवितर्क केले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
गेले काही दिवस पक्षात आपली घुसमट होत होती. पक्ष नेतृत्व तालुक्यातील संघटनेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. मात्र आपण फक्त आपल्या पदाचा राजीनामा दिला असून एक शिवसैनिक म्हणून आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेतील युवा नेतृत्व व एक चांगला अभ्यासू वक्ता म्हणून धुरी यांची ओळख आहे. त्यांच्या राजीनामा वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेला धक्का मानला जात आहे.